Showing posts with label Kruti AI. Show all posts
Showing posts with label Kruti AI. Show all posts

Wednesday, 11 March 2026

भारताच्या ए.आय. आकांक्षांसाठी व भारतीय टेक उद्योगासाठी एक वाईट दिवस!


आज, कदाचित भारताचा एकमेव व पहिला ए.आय. असिस्टंट ॲप, 'कृती ए.आय.' आजपासून म्हणजेच 11 मार्च 2026 पासून बंद होत आहे. ही आपण सर्व भारतीयांसाठी विचार करायला लावणारी बाब आहे.


काही महिन्यांपूर्वी, माझ्या दृष्टीस खऱ्या अर्थाने एक 'भारतीय' जनरेटिव्ह ए.आय. असिस्टंट दृष्टीस पडला. आणि विशेष म्हणजे हा ए.आय. असिस्टंट गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध होता. मी लगेचच हा ए.आय. असिस्टंट प्ले स्टोअर वरून डाउनलोड केला आणि तो वापरण्यास सुरुवात केली. हा जनरेटिव्ह ए.आय. असिस्टंट म्हणजेच 'कृती ए.आय.'. 'ओला' चे संस्थापक भावेश अग्रवाल यांचाच हा प्रोजेक्ट असल्याची माहिती आहे.


कृती ए.आय. मध्ये सुरुवातीला प्राॅम्प्ट दिल्यावर ते पेज क्रॅश होत असे. पण कालांतराने हे प्रमाण कमी झाले. कृती ए.आय. ची सुरुवात असताना देखील ह्या ए.आय. असिस्टंट ने अत्यंत समाधानकारक उत्तरे दिली आहेत, असा माझा अनुभव राहिला आहे. डीप रिसर्च म्हणजेच सखोल संशोधन करण्याची सुविधा ही कृती ए.आय. मध्ये उपलब्ध होती. त्यातही त्याने चांगले परिणाम दिले होते. ह्या ॲपवर कृती ए.आय. असिस्टंट तुम्हाला कॅब देखील बुक करून देत असे.


ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ कदाचित कृती ए.आय. वर ही वेळ का आली, याचे योग्य विश्लेषण करू शकतील. परंतु माझ्या मते, भारतीय इंटरनेट युजर सध्यातरी फ्री ए.आय. टूल्स् किंवा फ्री सोशल नेटवर्किंग ॲप्सच्या कॅटेगरीमध्ये स्वदेशी पर्याय निवडण्यास तयार नाही.  


पण जेव्हा कॅब बुकिंग ॲप्स, शो बुकिंग ॲप्स, ऑनलाइन शॉपिंग ॲप्स, ग्रोसरीज् व इसेन्शियल्स् डिलिव्हरी आणि फूड डिलिव्हरी ॲप्स अशा कॅटेगरीमध्ये सेवा व उत्पादनांच्या बाबतीत निर्णय घेताना, भारतीय इंटरनेट युजर हा त्या सेवेचा किंवा उत्पादनाचा गुणवत्ता आणि उपयोगितामूल्य यांचा विचार करतो. त्यामुळेच उबर आणि अमेझॉन सारख्या मूळच्या भारतीय नसलेल्या कंपन्या देखील आज भारतीय कंस्यूमर मार्केटवर अधिराज्य गाजवत आहेत.


कदाचित भारतीय इंटरनेट युजर हा फ्री ए.आय. टूल्स् किंवा फ्री सोशल नेटवर्किंग ॲप्सच्या कॅटेगरीमध्ये स्वदेशी पर्याय निवडण्यास संकोच करतो आणि दुर्लक्ष देखील करतो, असे जाणवते. मग ते उत्पादन किंवा ती सेवा कितीही चांगली असो, भारतीय इंटरनेट युजरच्या निर्णयात देशभक्तीचा मोठा अभाव जाणवतो असे मला वाटते.


याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, 'अरट्टई (Arattai)' मेसेजिंग ॲप किंवा झोहो (Zoho) कंपनीच्या इंटरनेटवर उपलब्ध विविध सेवा आणि ॲप्स. अशा भारतीय कंपन्या, ज्यांचे आंतरदेशीय व्यवहार नाहीत किमान त्यांनी तरी आग्रहाने झोहोच्या सेवांचा वापर केला पाहिजे. तसेच अधिकाधिक भारतीय युजर्सनी व्हॉट्सॲप सह अरट्टई (Arattai) इंस्टॉल करून त्यावर सक्रिय होण्याची गरज आहे. अरट्टई तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सह व्हॉट्सॲप सारख्याच जवळपास सर्वच सुविधा देत आहे. शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध असताना देखील भारतीय इंटरनेट युजर्ससाठी एक भारतीय म्हणून किमान हे ॲप इंस्टॉल करणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमात नसल्याचे दिसत आहे.


माझ्या मते, सध्या संपूर्ण जग भारताकडे एक असेम्ब्ली, कंस्यूमर मार्केट किंवा बाजारपेठ म्हणून पाहत आहे. भारतीयांच्या इंटरनेट डेटाचा विदेशी कंपन्यांच्या मूळ देशातील डेटा सेंटर्सच्या साहाय्याने आणि जागतिक मक्तेदारीच्या साहाय्याने जर ह्या विदेशी कंपन्या गैरवापर करत असतील तर ही धोक्याची सूचना आहे. म्हणूनच भारतीय टेक आणि आयटी कंपन्यांनी किमान भारतात तरी ह्या विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी स्पर्धेत उतरणं गरजेचं आहे, पर्यायी एप्लिकेशन्सची निर्मिती करणे आणि उपभोगत्यांनी (Consumers) देखील अशा प्रयत्नांना तितकीच साथ देणं आणि एक जरी कंपनी ही मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या कंपनीला स्वीकारणं गरजेचं आहे. सुरुवातीला कदाचित लहान ते मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव जाणवेल, त्रुटी आढळतील; पण सोशल मीडियाच्या जगात अशा त्रुटी ह्या कंपनीच्या व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणे फार अवघड नाही. जर आपणच अशा ॲप्सचा वापर करणार नसू, तर आपल्याला सरकार आणि भारतीय कंपन्यांना प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही असे मला वाटते.


ह्या क्षेत्रांना मी जगाच्या लाइमलाईट' मधील क्षेत्र असे संबोधतो.